थोडक्यात प्रक्रिया
सर्व प्रशासकीय विभाग व जिल्हा परिषदांच्या गट-ब, क आणि ड संवर्गांतील सर्व पदांच्या भरतीसाठी ‘महापदभरती पोर्टल’ हे एकच सर्वसमावेशक व गतिमान असे सामाईक पोर्टल असणार असून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, महामंडळे, प्राधिकरणे, इ. करिता त्यांच्या गट-ब, क आणि ड संवर्गांतील सर्व पदांच्या भरतीसाठीही सदर ‘महापदभरती पोर्टल’द्वारे सेवा उपलब्ध असणार आहे.
- महाराष्ट्र शासनातर्फे सध्या सर्व प्रशासकीय विभागांच्या व जिल्हा परिषदांच्या गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीसाठी द्विस्तरीय पद्धत राबविली जाणार आहे.
- त्यातील पहिल्या स्तरावर सर्व विभाग व जिल्हा परिषदांसाठी गटनिहाय ऑनलाईन सामाईक पूर्वपरीक्षा (Prelim) घेतली जाईल. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरण्यासाठी ही सामाईक पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे उमेदवारांना अनिवार्य असेल.
- सामाईक पूर्वपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची योग्यता क्रमांक (Merit Rank) दर्शविणारी सर्व विभागांसाठी सामाईक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वरील यादीतून संबंधित विभागातील विशिष्ट पदांसाठी इच्छुक असलेल्या एकूण उमेदवारांमधून प्रत्येक विभाग हा त्यांच्याकडील उपलब्ध प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या प्रमाणात उचित संख्येच्या उमेदवारांची त्यांच्या योग्यता क्रमांकानुसार दुसऱ्या स्तरावर घेण्याच्या ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’साठी (Main परीक्षेसाठी) निवड करेल आणि त्यांचीच परीक्षा घेईल.
- या ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’त उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दोन्ही (Prelim व Main) स्तरांवरील परीक्षांमधील गुणांची बेरीज करून त्यानुसार विभागवार-पदनिहाय गुणवत्ता यादी तयार होईल व त्यानुसार त्यांना नवे प्रवर्गनिहाय व विभागवार-पदनिहाय योग्यता क्रमांक दिले जातील. या नव्या योग्यता क्रमांकानुसार व रिक्त पदांच्या संख्येनुसार उचित संख्येच्या उच्च योग्यता क्रमांकधारक उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात येईल.
तपशीलवार प्रक्रिया
- उमेदवाराला ‘महापदभरती पोर्टल’वरील सर्व सेवा सुरक्षित स्वरुपात घेता याव्यात यासाठी प्रथम स्वत:चा मोबाईल क्रमांक, इमेल आय डी, आधार क्रमांक इ. सह आपली किमान आवश्यक वैयक्तिक माहिती ‘महापदभरती पोर्टल’वर भरावी लागेल.
- उमेदवाराला स्वत:च्या या मोबाईल व इमेल द्वारे प्राप्त झालेल्या OTP द्वारे आपला आधार क्रमांक आधार पोर्टलवरून सत्यापित (authenticate) करण्याची व त्यानंतरच ‘महापदभरती पोर्टल’साठीचा आपला अनन्य (unique) लॉगीन आयडी मिळविण्याची व पासवर्ड तयार करण्याची / बदलण्याची सुविधा असेल.
- ‘महापदभरती पोर्टल’वर प्रत्येक उमेदवाराचा सर्व प्रशासकीय विभाग व जिल्हा परिषदांसाठीच्या पूर्वपरीक्षेचा एकच सामाईक ऑनलाईन अर्ज त्याच्या लॉगीनमधून मोफत दाखल करून घेता येईल व तो वरील सत्यापनाद्वारे उमेदवाराच्या मोबाईल क्रमांक, इमेल आयडी आणि आधार क्रमांक यांच्याशी कायमचा संलग्न करण्यात येईल.
- उमेदवार आपला अर्ज केव्हाही दाखल करू शकतील जेणेकरून त्यांना त्यानंतरच्या विशिष्ट वारंवारितेने होणाऱ्या पूर्वपरीक्षा फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.
- उमेदवाराने लॉगीन आयडी (PRN क्रमांक) व पासवर्डचा उपयोग करून पूर्वपरीक्षेचा ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक व पूर्णपणे भरून झाल्यावर उमेदवाराच्या लॉगीनमध्ये अर्जाची पोहोच व छपाई-सुलभ प्रत तसेच अर्जात भरलेल्या माहितीची सत्यता व वैधता पडताळण्यासाठी उमेदवाराने सादर करावयाच्या आवश्यक अशा प्रमाणपत्रांची / सहपत्रांची परिपूर्ण यादी छपाई-सुलभ स्वरुपात उपलब्ध असेल.
- उमेदवाराने दाखल केलेल्या अर्जात त्याने / तिने भरलेली सर्व माहिती सत्य आणि वैध असून, तसेच त्यासंबंधीची पुराव्यादाखल सादर करावयाची सर्व सहपत्रे तो / ती निवड प्रक्रियेदरम्यान मागणी केली असता सादर करण्यास बांधील असून, ती माहिती अथवा पुराव्यादाखल सादर केलेली सहपत्रे असत्य व अवैध असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल हे त्याला / तिला माहीत व मान्य असल्याचे समजण्यात येईल अशी नियमावली ‘महापदभरती पोर्टल’वर स्वयंघोषणेद्वारे उमेदवारांना मान्य करावी लागेल.
- सर्वसाधारणपणे सदर माहिती व पुराव्यांची छाननी व सत्यता-पडताळणी मध्ये जे उमेदवार दोन्हीही परीक्षांनंतर निवडीसाठी शिफारसयोग्य ठरतील त्यांच्याबाबतीत पुढील कार्यवाही त्यावेळी त्या त्या विभागांच्या आपापल्या विहित नियमांनुसार करण्यात येईल.
- उमेदवार गट-ब किंवा / आणि गट-क किंवा / आणि गट-ड साठी एकच सामाईक अर्ज दाखल करू शकेल.
- मात्र त्याने एका पेक्षा ज्यास्त गटांसाठी सामाईक अर्ज दाखल केला असल्यास त्याला त्यातील प्रत्येक गटासाठी भिन्न व सशुल्क गटनिहाय पूर्वपरीक्षा द्यायची आहे.
- सर्व प्रशासकीय विभागांच्या / जिल्हा परिषदांच्या व त्यातील सर्व पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची एकच सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षा राज्यभर मासिक किंवा पाक्षिक किंवा साप्ताहिक वारंवारितेने (frequency) व जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ‘एमकेसीएल’च्या 2000+ ऑनलाईन परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकारमुक्त स्वरूपात नियमित घेण्यात येईल.
- सदर पूर्वपरीक्षेला बसण्यासाठी उमेदवार हे आपल्याला सोयिस्कर असलेल्या जिल्ह्यातील पूर्वपरीक्षा केंद्रांची, ‘महापदभरती पोर्टल’वरील उपलब्ध पर्यायांतून निवड करतील व त्याप्रमाणे त्या परीक्षा केंद्रात विहित शुल्क भरून व ‘महापदभरती पोर्टल’वर वेळोवेळी दर्शविलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षा देतील, त्यात मिळालेले गुण व निकाल (उत्तीर्ण / अनुत्तीर्ण) हे ‘महापदभरती पोर्टल’वरील आपल्या लॉगीनद्वारे माहित करून घेतील. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरण्यासाठी ही सामाईक पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची योग्यता क्रमांक (Merit Rank) दर्शविणारी सर्व विभागांसाठी सामाईक गुणवत्ता यादी ‘महापदभारती पोर्टल’वर प्रसिध्द करण्यात येईल व विशिष्ट वारंवारितेने घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या प्रत्येक फेरीनंतर ती अद्ययावत करण्यात येईल.
- पूर्वपरीक्षेतील गुणांमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पूर्वपरीक्षेच्या त्यानी दिलेल्या शेवटच्या परीक्षेनंतर तीन महिन्यांनी पुन्हा सशुल्क पूर्वपरीक्षा देता येईल व विहित वयोमर्यादेत व तत्सम इतर अटींसंदर्भात पात्र असेपर्यंत अशी सशुल्क पूर्वपरीक्षा पुन:पुन्हा तीन महिन्यांच्या अंतराच्या अटीच्या अधीन राहून देता येणार आहे.
- सदर पूर्वपरीक्षा प्रयत्नांमधील सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जाणार नसून केवळ सर्वात अलिकडच्या / ताज्या प्रयत्नातीलच गुणच पुढील संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
- प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम त्या वर्षासाठी अद्ययावत करण्यात करण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने मिळविलेले गुण ज्या कॅलेंडर वर्षात पूर्वपरीक्षेच्या ताज्या प्रयत्नात मिळविले असतील त्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंतच ग्राह्य धरण्यात येतील व पुढील वर्षाच्या 1 जानेवारी रोजी सर्व उमेदवारांचे मागील वर्षातील गुण अग्राह्य समजण्यात येतील.
- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अथवा संबंधित कार्यालये ही त्यांच्या गटनिहाय रिक्त पदांची सविस्तर ऑनलाईन जाहिरात विहित नमुन्यात ‘महापदभरती पोर्टल’वर प्रकाशित करतील. सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या संबंधित गटाच्या सर्व उमेदवारांना ती जाहिरात त्यांच्या व्यक्तीगत लॉगीनमध्ये आपोआप उपलब्ध होईल व त्यांना उच्च प्राथमिकतेच्या SMS सेवेद्वारे व इमेलद्वारे त्या जाहिरातीविषयी सूचित केले जाईल.
- पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या सदर उमेदवारांपैकी जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक असतील त्यांनी आपल्या व्यक्तिगत लॉगीनद्वारे ‘महापदभरती पोर्टल’वरील आपल्या पूर्वपरीक्षा अर्जातील माहितीत वरील जाहिरातीत मागितली असल्यास (कौशल्यविषयक किंवा अन्य) अतिरिक्त माहितीची भर घालावी लागेल त्या पदासाठी आपला ऑनलाईन अर्ज याच पोर्टलवर विहित मुदतीत दाखल करावा लागेल. आवश्यक त्या ठिकाणी काही कागदपत्रे उमेदवाराला जोडावी लागतील.
- अशा अर्जदार उमेदवारांच्या यादीतून संबंधित विभाग हा त्यांच्याकडील उपलब्ध प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या प्रमाणात उचित संख्येच्या उमेदवारांची त्यांच्या योग्यता क्रमांकानुसार दुसऱ्या स्तरावर घेण्याच्या ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’साठी (Main परीक्षेसाठी) निवड करतील.
- त्यामुळे सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले व जाहिरातीतील इतर पात्रता / अर्हता अटींची पूर्तता करणारे तसेच संबंधित पदांसाठी इच्छुकही असलेले निवडक उमेदवार संबंधित विभागाला पुढील ‘विभागवार-पदनिहाय मुख्य ऑनलाईन परीक्षे’साठी आपोआप व तत्काळ उपलब्ध होतील.
- अशा निवडक उमेदवारांच्या ‘विभागवार-पदनिहाय मुख्य ऑनलाईन परीक्षा’ इतर पूर्वनियोजित परीक्षांच्या तारखांना छेद देत नाहीत याची पोर्टलवर शहानिशा करून योग्य दिवशी शासनामार्फत नियुक्त केलेल्या योग्य संस्थांतर्फे घेण्यात येतील, त्यात मिळालेले गुण व निकाल (उत्तीर्ण / अनुत्तीर्ण) संबंधित उमेदवारांच्या ‘महापदभरती पोर्टल’वरील लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
- उमेदवाराने जितक्या विभागवार पदांसाठी अर्ज केले असतील तितक्या सशुल्क Main परीक्षा त्याला / तिला द्याव्या लागतील.
- या ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’त उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दोन्ही (Prelim व Main) स्तरांवरील परीक्षांमधील गुणांची बेरीज करून त्यानुसार विभागवार-पदनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्यानुसार त्यांना नवे विभागवार-पदनिहाय व प्रवर्गनिहाय योग्यता क्रमांक दिले जातील. या नव्या योग्यता क्रमांकानुसार व रिक्त पदांच्या संख्येनुसार उचित संख्येच्या उच्च योग्यता क्रमांकधारक उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात येईल.
- विभागवार-पदनिहाय व प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाईल. संबंधित अधिकारी तिच्या अचूकतेची पडताळणी करून ती ‘महापदभरती पोर्टल’वर प्रसिद्ध करतील व तसे करताना त्या त्या संस्थांनी त्यांच्या ऑनलाईन परीक्षा प्रणालीद्वारे परीक्षांदरम्यान संकलित केलेले व ‘महापदभरती पोर्टल’वर अपलोड केलेले सदर उमेदवारांच्या वर्तन-प्रतिमांचे रेकोर्डेड पुरावे तपासून उमेदवारांनी परीक्षा देताना गैरप्रकार केलेला नसल्याची खातरजमा करून घेतील.
- रिक्त पदांच्या प्रमाणात गुणवत्ता यादीतील शिफारसयोग्य उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतींची मूळ प्रतींशी संबंधित अधिकाऱ्यासमक्ष त्या त्या विभागाच्या कार्यालयात पडताळणी होईल तसेच त्याचवेळी दोन्ही स्तरांवरील ऑनलाईन परीक्षांदरम्यान उमेदवारनिहाय संकलित करण्यात आलेल्या वर्तन-प्रतिमांच्या रेकोर्डेड पुराव्यांच्या सहाय्याने उमेदवाराने परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार केलेला नाही याची संबंधित विभागाकडून त्याच्या विहित नियमावलीनुसार पुन्हा खातरजमा करून घेतली जाईल व त्या नंतरच निवडीसाठी शिफारसयोग्य उमेदवारांच्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात येईल.
- वरील संपूर्ण प्रक्रियेतून योग्य ठरलेल्या उमेदवारांची निवडीसाठी निवडसूचीद्वारे शिफारस करण्यात येईल.