महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांतील व जिल्हा परिषदांच्या मधील, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक सेवा निवड मंडळ यांच्या अखत्यारीतील गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीची नवी कार्यपद्धती शासनाने राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारांना सातत्याने पदभरती विषयक सुविधा जसे की, माफक शुल्कात सर्व परीक्षांकरिता एकच पदभरती अर्ज व ऑनलाईन सामाईक पूर्वपरीक्षा इ. सुविधा ह्या अत्यंत जलद गतीने आणि कमीत कमी खर्चामध्ये प्रदान करणे हा या पदभरती प्रक्रियेमधील मुख्य हेतू आहे. सदर पदभरती प्रक्रिया सहज आणि सोप्या पद्धतीने, पारदर्शीपणे राबविता यावी याकरिता सर्वसमावेशक व गतिमान अशा ‘महापदभरती’ पोर्टल या कार्यप्रणालीची निर्मिती केली आहे.
पदभरती राबविणार्या शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांद्वारे आता उमेदवाराने ‘महापदभरती’ पोर्टलवरुन केलेला एकच सामाईक अर्ज हा आधार पडताळणी नंतर पदभरती प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे उमेदवाराला अर्ज प्रक्रियेसाठी आता वारंवार खर्च करावा लागणार नाही. तसेच संबंधित विभागांकडून पदभरती विषयक आवश्यक ती सर्व माहिती ही उमेदवारांना वेळोवेळी नोटिफिकेशन द्वारे कळविली जाणार आहे. उमेदवार आपला सामाईक अर्ज केव्हाही दाखल करू शकेल.
महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रशासकीय विभागांच्या व जिल्हा परिषदांच्या गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीसाठी द्विस्तरीय पद्धती लागू केली जाणार आहे, त्यातील पहिल्या स्तरावर सर्व विभाग व जिल्हा परिषदांसाठी गटनिहाय ऑनलाईन सामाईक पूर्वपरीक्षा (Prelim) घेतली जाणार असून निवडीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरण्यासाठी ही सामाईक पूर्वपरीक्षा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची योग्यता क्रमांक (Merit Rank) दर्शविणारी सर्व विभागांसाठी सामाईक गुणवत्ता यादी वेळोवेळी प्रसिध्द केली जाईल.
पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीतून संबंधित विभागातील विशिष्ट पदांसाठी इच्छुक असलेल्या एकूण पात्र उमेदवारांसाठी शासनामार्फत ‘विभागवार-पदनिहाय मुख्य ऑनलाईन परीक्षे’चे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये संबंधित पदांसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट विषयांचे ज्ञान विचारात घेतले जाईल. पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच निवड प्रक्रियेतील आवश्यकतेप्रमाणे विविध विभागांमर्फत घेतल्या जाणार्या शारीरिक अथवा व्यावसायिक चाचणी यात मिळालेले गुण हे सर्व एकत्रित गुण विचारात घेतले जाणार असून त्यानुसार उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्याआधारे निवडसूची तयार करून छाननी अंती त्यातील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार पुढील निवडीकरता शिफारस करण्यात येणार आहे.
पदभरतीची ही संपूर्ण कार्यपद्धती अत्यंत गैरप्रकारमुक्त असणार असून तिची गुणवत्ता, वस्तुनिष्ठता, पारदर्शकता, विश्वसनीयता, तसेच तिचा नि:पक्षपातीपणा हा वादातीत असणार आहे. महापदभरती प्रणालीमुळे विविध प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय राखून तिच्यात एकसूत्रता आणण्यास मदत होणार आहे. एकाच किंवा भिन्न प्रशासकीय विभागांच्या, एकाच किंवा भिन्न वर्षांतील प्रत्येक नव्या जाहिरातीसाठी, एकाच जाहिरातीतील भिन्न पदांसाठी, एकाच प्रशासकीय विभागाच्या भिन्न जिल्ह्यातील किंवा प्रादेशिक स्तरावरील पदांसाठी पुन:पुन्हा अर्ज भरणे, संबंधित कागदपत्रे पुन:पुन्हा अपलोड करणे, त्याच त्या विषयांची परीक्षा पुन:पुन्हा देणे, इ. व त्यासाठी पुनःपुन्हा शुल्कआकारणी हा उमेदवारांचा त्रास आता कमी होणार आहे. उमेदवारांना पदभरती प्रक्रीयेदरम्यान आवश्यक महिती व्यक्तीअनुरूप स्वरूपात त्यांच्या स्मार्टफोनवर व ‘महापदभरती पोर्टल’वर वेळोवेळी व तत्काळ मिळत राहणार आहे.
थोडक्यात भरती प्रक्रियेसाठी इच्छुक सर्व उमेदवार आणि शासनाचे विविध प्रशासकीय विभाग या दोघांनाही अत्यंत फायदेशीर असणारी महापदभरती पोर्टलची कार्यपद्धती आहे.