1. सर्व प्रशासकीय विभागांच्या / जिल्हा परिषदांच्या व त्यातील सर्व पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची गटनिहाय सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षा ही राज्यभर मासिक किंवा पाक्षिक किंवा साप्ताहिक वारंवारितेने (frequency) व जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ‘एमकेसीएल’च्या 2000+ ऑनलाईन परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकारमुक्त स्वरूपात नियमित पद्धतीने घेतली जाणार आहे.
  2. उमेदवाराला सामाईक पूर्वपरीक्षा कधी द्यायची आहे हे महापदभरती पोर्टलवर उपलब्ध असलेल्या संगणकीय प्रणालीवर नमूद करावे लागेल. एका गटासाठी केवळ एक म्हणजेच वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळे उपलब्ध पर्याय निवडावे लागतील.
  3. सदर सामाईक पूर्वपरीक्षा देण्यासाठी उपलब्ध असलेले आठवडे आणि तदअनुषंगाने उपलब्ध परीक्षा केंद्रे याची जिल्हानिहाय माहिती ‘महापदभरती पोर्टल’वर दर्शविली जाईल.
  4. सामाईक पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेशपत्राची छपाई सुलभ प्रत ही उमेदवाराला निवडलेल्या परीक्षा केंद्राची खात्री केल्यावर डाऊनलोड करण्यासाठी/ प्रिंट करण्यासाठी त्यांच्या लॉगीन मध्ये तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवार प्रवेश पत्राची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून घेऊ शकतील.
  5. उमेदवाराच्या प्रवेश पत्रावर त्याने निवडलेल्या एका गटासाठीचे निवडलेले परीक्षा केंद्राचे नाव, केंद्राचा पत्ता, गुगल मॅपवरील ठिकाण, केंद्राचा संपर्क तपशील, विभागनिहाय सहाय्य केंद्राचा संपर्क तपशील, परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ आणि परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना इत्यादीची माहिती असेल.
  6. प्रत्यक्ष सामाईक पूर्वपरीक्षा देण्यापूर्वी उमेदवाराने प्रवेश पत्रावरील दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक समजून घ्याव्यात. प्रवेश पत्रामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.
  7. उमेदवाराच्या ओळखपत्राची छाननी, ओळख पडताळणी, त्याची / तिची हजेरी, इ. बाबी शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार काटेकोरपणे पूर्ण केल्या जाणार आहेत.
  8. उमेदवारांच्या संख्येनुसार ही पूर्वपरीक्षा मासिक / पाक्षिक / साप्ताहिक वारंवारितेने घेण्यात येईल.
  9. पूर्वपरीक्षेचा अवधी एक तास (60 मिनिटे) असेल.
  10. पूर्वपरीक्षेमध्ये समान काठीण्य पातळीचे एकूण 100 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.
  11. प्रश्नपत्रिकेतील एकूण 100 प्रश्नांमध्ये वरील प्रत्येक विषयाची प्रश्नसंख्या समान असेल.
  12. पूर्वपरीक्षा एकूण 100 गुणांची असेल.
  13. अचूक उत्तर दिलेल्या प्रत्येक प्रश्नास +1.0 (अधिक एक) गुण मिळेल.
  14. चुकीचे उत्तर दिलेल्या प्रत्येक प्रश्नास -1.0 (उणे एक) गुण मिळेल.
  15. न सोडविलेल्या प्रत्येक प्रश्नास 0.0 (शून्य) गुण मिळतील.
  16. उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 45 गुण मिळविणे अनिवार्य असेल.
  17. सदर परीक्षा उत्तीर्ण होणे ही ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’स बसण्यासाठीच्या पात्रता अटींपैकी केवळ एक पण अत्यावश्यक अशी अट आहे. पण केवळ तेवढेच पुरेसे नसून सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेतील उत्तीर्णांच्या गुणवत्ता यादीतील उमेदवाराचा योग्यता क्रमांक व विशिष्ट विभागाच्या पदभरती जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येच्या प्रमाणात किती उमेदवारांना ‘विभागवार-पदनिहाय मुख्य परीक्षे’ला बोलवावे यासंबंधीच्या त्या त्या विभागाच्या नियमांनुसार घेतलेल्या निर्णयांवरही ती अवलंबून असेल.